जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक रुप घेतल्याने संपूर्ण जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. काही वेळापूर्वी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एअरटेल कंपनीने इंटरनेटची सेवा बंद केली. इतर कंपन्यांनीही हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, जालन्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत केल्याचे समजते.
कालपासून जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जागोजागी टायर जाळून रस्ते अडवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यानंतर परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एअरटेल कंपनीने आपली इंटरनेटची सेवा बंद केली. इंटरनेट सेवा बंद झाल्याचा मेसेज नागरिकांना आपल्या मोबाईलवर आला आहे. त्याचप्रमाणे जिओ आणि इतर मोबाईल कंपन्यांकडूनही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दोन दिवस इंटरनेट बंद राहणार
बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जालना जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.