34.8 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरसरकारचे निर्णय अमान्य

सरकारचे निर्णय अमान्य

अंतरवाली : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेले आंदोलन शमविण्यासाठी न्या. शिंदे समितीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारचा हा निर्णय अमान्य असल्याचे म्हटले. आम्ही अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही आणि वाटू देणार नाही असे सांगत त्यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. याबाबत सरकारने पावले न उचलल्यास उद्यापासून जलत्याग करू. मग पुढील परिणामाला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, त्यांनी आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक काड्या करणारे असून, भाजपमध्ये रंगीबेरंगी माणसे उभी करून पुरती वाट लावल्याची टीका केली. त्यामुळे भाजप नेत्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्या. संदीप शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारण्यात आला. तसेच कुणबी उल्लेख असणा-यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरियल डेटा गोळा करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.. न्यायमूर्तींचे सल्लागार मंडळ आरक्षणाच्या कायदेशीर बाबतीत मार्गदर्शन करेल, असेही ठरले.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळावरून माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले की, सकाळी सरकारला सांगितले होते की, सरसकट निर्णय घ्यावा.

ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र न देता सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली. बीडमधील हिंसाचार प्रकरणी निर्दोष मराठा युवकांना अटक करण्यात आली. मात्र, ही दडपशाही बंद करावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये. राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करावी आणि शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार करावा. राज्य सरकारने आता ठोस निर्णय घेतला नाही तर उद्यापासून पाणी घेणे बंद करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला.

आंदोलकांना त्रास देऊ नका
बीडमधील हिंसाचारानंतर पोलिस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. बीड पोलिसांनी ही कारवाई ताबडतोब बंद करावी. बीडमधील पोरांवर गुन्हे दाखल केले तर मी बीडमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसेल. महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलकाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

फडणवीसांची शाहांसोबत चर्चा
मराठा आंदोलनाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती गृहमंत्र्यांना दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR