पुणे : प्रतिनिधी
राज्यात सध्या हवामानाचा विचित्र खेळ सुरू असून नागरिकांसह शेतकरीही मोठ्या चिंतेत सापडले आहेत. एका बाजूला कडक उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे पोहोचला आहे, तर दुस-या बाजूला अवकाळी पावसाने अनेक भागांना अक्षरश: झोडपून काढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामान बदलताना दिसत आहे. एप्रिल महिन्यापासूनच अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, तर काही भागात उष्णतेने कहर केला. कोकणात दमट आणि उकाड्याचे वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आणि वेगवान वा-यांचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतक-यांच्या अडचणीतही मोठी भर पडली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला आणि मालेगावमध्येही तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात काही दिवस तापमानात घट झाली होती, मात्र पुन्हा उष्णतेची लाट वाढली आहे. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागत असून उष्माघाताचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त होत आहे.
पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट
हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतीपिकांवर परिणाम होत असल्याने ग्रामीण भागात चिंता अधिक वाढली आहे.
















