छ. संभाजीनगर : मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढली असून, ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. थेट रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको करतानाच वाहनेही रोखली जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यात रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. एसटी सेवाही जागेवरच थांबवली गेली आहे. आंदोलक दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याने आज ठिकठिकाणी बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या. याची झळ सर्वांना सोसावी लागत आहे.
जालन्यासह बीड, छ. संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करतानाच थेट रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखली जात आहे. सर्व जिल्ह्यांत सर्वत्र आंदोलन पेटले आहे. महामार्ग, राज्य मार्गासह गावोगावच्या रस्त्यावर रास्ता रोको करून सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. यासोबतच लातूर, धाराशिवमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरून मंगळवारी थेट व्यापारीपेठा बंद केल्या. त्यामुळे लातूर, धाराशिवमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. दरम्यान, परिस्थिती चिघळत असल्याने धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली.
छ. संभाजीनगर येथे एसटी बसच्या रोजच्या १४०० फे-या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. परभणी जिल्ह्यातही १३ ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे परभणीला जोडणा-या जवळपास सर्वच रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. नांदेडमध्येदेखील विविध ठिकाणी रास्ता रोको झाला. नायगाव शहर कडकडीत बंद होते.
बीडमध्ये जाळपोळ सुरूच
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची घरे आणि कार्यालय जाळल्यानंतर बसवर दगडफेक केली गेली. तसेच शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख कुंडलिक खाडे यांचे कार्यालय जाळले. याशिवाय वडवणी येथील बाजार समितीचे कार्यालयही फोडले.
नांदेडमध्ये मोर्चे,
आंदोलनास विरोध
नांदेड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय, सर्व राज्य महामार्गावर व इतर सर्व मार्गांवर वाहतूक सेवा सुरळीत सुरू राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढील आदेशापर्यंत उपोषणे, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको, आंदोलने करण्यास प्रतिबंध केले आहे.