बंगळूरू : भारतीय शहरांची वाढ ही प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाच्या (पेट्रोल-डिझेल आणि दगडी कोळसा) वापराशी आणि त्यातून निर्माण होणा-या प्रदूषणाशी निगडित राहिली आहे. परिणामी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे. जगभरातील ३९० अधिक प्रदूषित आणि अधिक समृद्ध शहरांपैकी १३८ शहरे (किंवा सुमारे ३५.४%) भारतात आहेत, असे भीषण वास्तव नेचर सिटीज या नियतकालिकात प्रकाशित रिपोर्टमध्ये मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे चीनमधील (७१९ शहरे ) आणि इतर अनेक देशांनी स्वच्छ शहरीकरणाच्या बाबतीत आघाडी घेतली असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
‘नेचर सिटीज’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये जगभरातील ५,४३५ शहरांचा अभ्यास करण्यात आला. २०१९ ते २०२४ या काळातील उपग्रहांचा डेटा, नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण आणि शहरांचे एकूण आर्थिक उत्पन्न यांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
संशोधकांनी वाहने, उद्योग आणि औष्णिक वीज प्रकल्पांतून निघणा-या नायट्रोजन डायऑक्साइडच्या उपग्रहीय नोंदी घेतल्या. त्यांची तुलना शहरांच्या जीडीपीशी केली. त्यानुसार शहरांचे स्वच्छ आणि श्रीमंत, प्रदूषित आणि श्रीमंत, स्वच्छ आणि गरीब आणि प्रदूषित आणि गरीब अशी वर्गवारी करण्यात आली. अभ्यासात समाविष्ट केलेल्या ९०२ भारतीय शहरांपैकी १५.३% शहरांमध्ये २०१९ ते २०२४ दरम्यान एनओ२ च्या पातळीत झालेली वाढ चिंताजनक आहे. ‘प्रदूषित आणि श्रीमंत’ श्रेणीत भारताचा वाटा जगात सर्वाधिक (३५.४%) आहे. संशोधकांच्या मते ही अपयशी शहरे नसून वेगाने वाढणारी शहरे आहेत, पण त्यांची वाढ प्रदूषणासोबत होत आहे. तसेच, भारत प्रदूषित आणि गरीब या सर्वात चिंताजनक श्रेणीतही दिसला, जिथे आर्थिक प्रगती खुंटली आहे पण प्रदूषण वाढत आहे.
शहरांच्या यादीत नाशिकचा समावेश
जगभरातील ३९० शहरे अधिक प्रदूषित आणि अधिक श्रीमंत’ या श्रेणीत आली आहेत. म्हणजेच, येथे आर्थिक विकास तर झाला, पण सोबतीने प्रदूषणही वाढले. विशेष म्हणजे, या ३९० शहरांपैकी १३८ शहरे (सुमारे ३५.४%) एकट्या भारतात आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या महानगरांनी स्वच्छ विकास दाखवला असला, तरी भारतातील इतर अनेक शहरे अजूनही वाहतूक, उद्योग आणि वीज निर्मितीसाठी कोळसा, पेट्रोल-डिझेलवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जगातील पहिल्या १० ‘प्रदूषित आणि श्रीमंत’ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश आहे.
















