शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी शहरालगत असलेले डम्पिंग ग्राउंड (कचरा डेपो) तात्काळ अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पोलीस ठाणे, नगरपंचायतीने विकसित केलेले गार्डन, जलकुंभ, घरणी नदी, विविध समाजांची स्मशानभूमी, आठवडी बाजार, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, हनुमान मंदिर,जनावरांचा दवाखाने तसेच नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी टाकण्यात येणा-या कच-यामुळे व तो वारंवार जाळण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी, धुराचे लोट व अस्वच्छता निर्माण होत आहे.
यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून विशेषत: लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच घरणी नदी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. शहरालगत डम्पिंग ग्राउंड असणे हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने ते शहराबाहेरील योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे. तसेच तोपर्यंत कचरा जाळण्याचे प्रकार तात्काळ बंद करून नियमित स्वच्छता व योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर संदीप धुमाळे माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, गंगाधर चाकोते व्यापारी असोसिएशनचे सचिव, शुभम शेरसांडे युवासेना शहराध्यक्ष, मारोती मलशेट्टे, आकाश चाकोते, बालाजी सलगरे, आनंद मुचळंबे यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.
















