नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनात संसदेच्या सुरक्षेवरून विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाची मागणी केली होती. या काळात विरोधी पक्षाकडून कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभेतील १४६ खासदारांना निलंबित करण्यात आले. तसेच खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर मिमिक्री केल्याने वादाला उधाण आले, त्यानंतर हे प्रकरण अधिकच तापले. या सर्व प्रकारानंतर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली असून आमचा लढा सभापतींविरोधात नसून सत्ताधाऱ्यांविरोधात आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी सांगितले की, राज्यसभेच्या अध्यक्षांच्या वतीने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना २-३ पत्रे लिहिली गेली आहेत. या सर्व पत्रांना मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तरही दिले आहे. सोमवारी (दि. २५) अध्यक्षांच्या भेटीबाबत बोलायचे झाले तर ते दिल्लीबाहेर असल्याने सोमवारी त्यांची भेट होऊ शकली नाही. येत्या दोन-तीन दिवसांत ते अध्यक्षांची भेट घेणार आहेत. आमचा लढा सभापतींविरोधात नसून सत्ताधाऱ्यांविरोधात आहे, असेही ते म्हणाले. राज्यसभा सभापती आणि लोकसभा अध्यक्षांचा आम्ही पूर्ण आदर करतो, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, सभागृह चालवायचे की नाही हे सरकारने ठरवावे. विरोधकांना संधी द्यायची की नाही? हा खरा मुद्दा आहे. आमची एकच मागणी आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षा भंगाच्या मुद्द्यावर निवेदन द्यावे. ते सभागृहाकडे दुर्लक्ष करून बाहेर वक्तव्य करत आहेत. १३ डिसेंबरला संसदेत घडलेल्या घटनेवर सभागृहात उत्तर देण्याचे ते सातत्याने टाळत आहेत.