मुंबई : बहुप्रतीक्षित ठरलेल्या ‘डॉन ३’ चित्रपटाभोवतीचा वाद आता अधिकच चर्चेत आला असून अभिनेता Ranveer Singh आणि दिग्दर्शक-अभिनेता Farhan Akhtar यांच्यातील मतभेदांमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. चित्रपटाच्या शूटिंगला अवघे दहा दिवस शिल्लक असताना रणवीर सिंगने प्रकल्पातून माघार घेतल्याची चर्चा असून, त्यामुळे निर्मिती प्रक्रियेला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीरच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे चित्रपटाचे वेळापत्रक, आर्थिक नियोजन आणि इतर तांत्रिक बाबींवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर निर्माते आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा उद्योगवर्तुळात रंगली आहे.
४० कोटींच्या नुकसानभरपाईची चर्चा
मीडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणात फरहान अख्तर यांनी रणवीर सिंगकडे तब्बल ४० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केल्याचे बोलले जात आहे. तसेच Federation of Western India Cine Employees (FWICE) कडूनही रणवीर सिंगला असहकाराची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हा वाद केवळ दोन कलाकारांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या चर्चेचा विषय बनला आहे.
आता ‘भाईजान’ मैदानात
दरम्यान, या वादात आता बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा Salman Khan यांची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. सलमान खानचे रणवीर सिंग आणि फरहान अख्तर या दोघांशीही मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांनी मध्यस्थीची भूमिका स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार, सलमानने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली आहे. कोणाच्याही करिअरला किंवा प्रकल्पाला नुकसान न पोहोचता या प्रश्नावर तोडगा काढण्याचा सल्ला त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे.
‘क्रिएटिव्ह मतभेद उद्योगाचा भाग’
सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खानने फरहान अख्तर यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला आहे. चित्रपटसृष्टीत क्रिएटिव्ह मतभेद ही नवी गोष्ट नसून अनेकदा कलाकार आणि दिग्दर्शकांमध्ये भूमिका, पटकथा किंवा चित्रपटाच्या दृष्टीकोनावरून मतभेद निर्माण होत असतात. अशा परिस्थितीत संवादाच्या माध्यमातून मार्ग काढणे आवश्यक असल्याचे सलमानने सुचवल्याची माहिती आहे. दुसरीकडे, रणवीर सिंगसोबतही सलमानने बराच वेळ चर्चा केल्याचे सांगितले जाते. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि भविष्यातील व्यावसायिक संबंधांवर परिणाम होणार नाही, यासाठी सलमान प्रयत्नशील असल्याचे समजते.
आमिर खाननेही केला होता प्रयत्न
विशेष म्हणजे या वादावर तोडगा काढण्यासाठी यापूर्वी Aamir Khan यांनीही पुढाकार घेतल्याची चर्चा होती. त्यांनी रणवीर आणि फरहान या दोघांनाही शांततेने प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त होते. मात्र अद्याप या वादावर अंतिम तोडगा निघालेला नसल्याचे दिसून येत आहे.
‘डॉन ३’चे भवितव्य काय?
‘डॉन’ फ्रँचायझी हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट मालिकांपैकी एक मानला जातो. त्यामुळे ‘डॉन ३’ संदर्भातील प्रत्येक घडामोड चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे. रणवीर सिंगच्या संभाव्य माघारीनंतर चित्रपटात नव्या अभिनेत्याची एंट्री होणार का, की दोन्ही बाजूंमध्ये समझोता होऊन प्रकल्प पुन्हा मार्गी लागणार, याकडे आता चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रणवीर सिंग, फरहान अख्तर किंवा सलमान खान यांच्या वतीने या चर्चांबाबत अधिकृत भूमिका समोर आलेली नसल्याने उद्योगवर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
















