१० जूनपर्यंत राज्यात हजेरी, सध्या मान्सूनपूर्व पावसाची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी
मान्सून कधी दाखल होणार, याची चिंता सर्वांनाच होती. १ जून आला तरी केरळात मान्सून कधी येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर आज केरळात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. परिणामी दक्षिण भारतातून हळूहळू वर सरकत मान्सून महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकते. सध्या राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात आज दुपारनंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही. कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला असला तरी राज्यभरात पोहोचायला त्याला काहीसा अवकाश आहे. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
भारतीय हवामान विभागाच्या वतीने नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाल्यास तो सामान्य मानला जातो. नैऋत्य पाऊस मध्य भारत व दक्षिण भारतात सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वायव्य भारतात सामान्य, ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी, मान्सून कोर झोनवर सामान्यपेक्षा जास्त होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होतो आणि १५ जुलैपर्यंत संपूर्ण देशभर पोहोचतो.
हवामान अनुकूल
नैऋत्य मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत पुढे सरकण्याची शक्यता असून, संपूर्ण केरळ व्यापू शकते. साधारणपणे मान्सून १ जूनच्या आसपास केरळममध्ये दाखल होतो, परंतु यावेळी त्याचा वेग थोडा मंद राहिला. अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांत मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामान अनुकूल बनले आहे. यासोबतच बंगालच्या उपसागरातील अनेक भागांमध्येही मान्सून पुढे सरकू शकतो.
















