झरी : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवार, दि.१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिंतूर परभणी रोडवरील सरकारी दवाखाना परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदालनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लांगून वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करण्याची वेळ आली.
सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रमुख मागणीसाठी झरी येथील राज्य महामार्गावर बुधवारी सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलनास सुरूवात करण्यात आली. यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या वेळी आंदोलकांच्या घोषणा बाजीने परिसर दणाणून गेला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासानाला आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांची मुदत दिल्या नंतरही ठोस पावले उचलल्या जात नसल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहे.
यात पुढा-यांना गाव बंदी, कँडल मार्च, रास्ता रोको, साखळी उपोषण आदी आंदोलने शांततेच्या मार्गाने करण्यात येत आहेत. आज करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. या आंदोलनाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या वेळी ग्रामीण उपविभागीय पोलिस अधीक्षक आर. एस. शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल कुरुंदकर यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रूग्णवाहिकेस मोकळा करून दिला रस्ता
झरी येथे रास्ता रोको आंदोलन चालू असताना एक अॅम्बुलन्स व एक खाजगी गाडीस जिंतूर परभणी महामार्गावरून जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देवून माणुसकीचे दर्शन आंदोलकांनी घडवले.