17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीय विशेषमहाराष्ट्राचा मूड, महायुतीची चिंता वाढवणारा !

महाराष्ट्राचा मूड, महायुतीची चिंता वाढवणारा !

कसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. दीड महिना आधी, म्हणजेच एप्रिलमध्येच निवडणूक लागेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाची सध्या जोरदार तयारी सुरू असून, भाजपाने देशातील वातावरण राममय करण्याचे नियोजन केले आहे. याच वातावरणात निवडणूक होणे अधिक लाभदायक ठरेल, अन्य सगळे अडचणीचे विषय मागे पडतील असे त्यांना वाटते आहे. मागच्या आठवड्यात दोन प्रतिष्ठित संस्थांनी जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपाला चांगले यश मिळेल, भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९५ ते ३३५ जागा, तर काँग्रेसच्या इंडिया आघाडीला १६५ ते २०५ जागा मिळतील असे भाकित वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे भाजपात ‘फिल गुड’चे वातावरण असले तरी महाराष्ट्रातील नेत्यांची मात्र या निष्कर्षांनी चिंता वाढवली आहे.

देशभरात भाजपा पुढे राहील असे सांगतानाच महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीला आघाडी मिळेल असे भाकित वर्तवले आहे. आघाडीला महाराष्ट्रात २६ ते २८ जागा मिळतील, तर महायुतीला १९ ते २१ जागा मिळतील असा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राची सत्ता काबीज करूनही महाराष्ट्रातले राजकीय वातावरण फारसे बदललेले नाही. राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार यांच्यासह दोन तृतीयांश राष्ट्रवादीलाही भाजपाने सोबत घेतले. दोन पक्ष फोडून जवळपास नव्वद आमदार सोबत आणल्यावरही वातावरण फारसे बदलत नसल्याने महायुतीच्या, विशेषत: भाजपा नेत्यांमध्ये अस्वस्थता होतीच. दोन प्रतिष्ठित मोठ्या संस्थांनी केलेल्या जनमत चाचण्यांच्या निष्कर्षांनी त्यात भर घातली आहे.

जनमत चाचण्यांच्या अंदाजानुसार बिहार, पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात भाजपापेक्षा इंडिया आघाडी पुढे राहील. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण २२३ जागा आहेत. तेथे भाजपाचे संख्याबळ घटले तर जनमत चाचण्यांचे अंदाजही चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील चार महिने भाजपाचा सर्व फोकस या राज्यांवर असणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेना युतीला महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ जागा मिळाल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचा राजकीय पट पूर्णत: बदलला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला जवळपास सव्वादोनशे विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत युतीच्या मतांमध्ये घट झाली .

१६० जागा निवडून आल्या. यानंतर मुख्यमंत्रिपदावरून वाद होऊन महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नवे समीकरण तयार झाले. महाराष्ट्रासारखे राज्य तर हातातून गेलेच, पण हे समीकरण कायम राहिले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसेल याची भीती भाजपाला वाटत होती. त्यामुळे तीन वर्षे अनेक प्रयत्न करून तीन पक्षांचे सरकार पाडले गेले. आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. यामुळे सरकार बदलले तरी वातावरण बदललेले नाही. किमान आज तरी तशी स्थिती कुठे दिसत नाही. दोन जनमत चाचण्यांनी भाजपा नेत्यांना वाटणारी भीती अनाठायी नसल्याचे निष्कर्ष काढले आहेत. अर्थात जनमत चाचण्या म्हणजे निकाल नाहीत. त्यांचे अंदाज नेहमीच बरोबर आले आहेत असेही नाही. तरीही हा महायुतीच्या नेत्यांसाठी इशारा आहे. फोडाफोडीच्या राजकारणावर लोकांची दिसणारी प्रतिक्रिया, आरक्षणामुळे मराठा व ओबीसी समाजात असणारी अस्वस्थता ही दोन महायुतीसमोरची सर्वांत मोठी आव्हाने असणार आहेत. जागावाटप ही सुद्धा मोठी डोकेदुखी असेल. शिवसेनेत फूट पडल्यानंतर १३ खासदार पुढच्या निवडणुकीची हमी घेऊन शिंदे यांच्यासोबत आले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही १२ जागा हव्या आहेत. त्यांना २५ जागा सोडल्या तर भाजपाला केवळ २३ जागा लढाव्या लागतील. भाजपा नेत्यांचा सध्याचा सूर बघता भाजपा किमान ३० जागा लढवेल असे दिसते आहे. याचाच दुसरा अर्थ शिंदे आणि अजित पवार यांना फारतर १८ जागा मिळतील. त्यात शिंदेंचे १३ खासदार आहेत. म्हणजे महविकास आघाडीच्या जागावाटपाचे वाद दिसत असले तरी महायुतीत सर्व आलबेल आहे असे नाही. या सगळ्या बाबी लक्षात घेता महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काळात मोठ्या घडामोडी घडतील असे दिसते आहे.

राज ठाकरेंच्या भेटीमागचे राज !
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. भेटीस कारण की……म्हणून नेहमीचे विषय सांगितले. पण ही गेल्या वर्षभरातील नववी भेट असल्याने स्वाभाविकच सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. महायुतीत तीन पक्ष असूनही हमखास विजयाचे कॉम्बिनेशन तयार होत नसल्याने त्यात मनसेला घेण्याचा प्रयत्न तर सुरू झालेला नाही ना, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे. शिंदे यांच्यासोबत दोन तृतीयांश आमदार, खासदार आले असले तरी त्या प्रमाणात पक्षाचे केडर, परंपरागत मतदार सोबत न आल्याने एका ठाकरेंसोबत त्यांना युती करायची आहे का ? असाही प्रश्न विचारला जातोय. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयविरोधी भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत युती करणे भाजपाला अडचणीचे वाटते आहे. पण त्यांनी २०१४ सारखा ते लढत नसलेल्या मतदारसंघात पाठिंबा द्यावा, जेथे ठाकरेंची शिवसेना प्रबळ आहे तेथे मनसेचा उमेदवार देऊन मतविभागणी करावी, असे काही प्रयत्न सुरू आहेत का? अशीही चर्चा आहे. भाजपाला थेट युती करता येत नसेल तर शिंदेंसाठी काही जागा सोडून त्यांची व मनसेची पोटयुती होईल का? असाही एक तर्क आहे. आज यातील कोणत्याच प्रश्नाचे उत्तर मिळणार नसले तरी, काही तरी शिजतंय हे मात्र स्पष्ट दिसत आहे.

जागावाटपावरून आघाडीतही हमरीतुमरी !
इंडिया आघाडीत किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत अजून जागावाटपाची अधिकृत चर्चा सुरू झालेली नसली तरी, कोण किती जागा लढवणार यावरून सध्या कलगीतुरा सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी शिवसेना २३ जागा लढवणार असल्याचे जाहीर करून वाद निर्माण केला आहे. मुंबईतील सहापैकी चार जागांवरही दावा सांगितला आहे. स्वाभाविकच काँग्रेस नेत्यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या. उरलेल्या जागा तरी कशाला सोडता, त्याही तुम्हीच लढवा, असा टोला मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी लगावला. तर पक्षाचे चाळीस आमदार सोडून गेल्यानंतर २०१९ च्या ताकदीचे दावे करू नका, असे मिलिंद देवरा यांनी फटकारले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे प्रत्येकी १०-१५ आमदार राहिले आहेत. तर काँग्रेस हा एकमेव पक्ष अजूनतरी शाबूत असून त्यांचे ४३ आमदार आहेत. त्यामुळे लोकसभेच्या अधिक जागा काँग्रेसच्या वाट्याला येतील, अशी अपेक्षा काँग्रेसचे राज्यातले नेते व्यक्त करत असतात. तरीही काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी समंजस भूमिका घेऊन दोन्ही पक्षांना झुकते माप देण्याची तयारी दर्शवली आहे. अजून आकडे ठरायचे असताना संजय राऊत यांनी २३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केल्याने पेच निर्माण झाला. काट्याचा नायटा होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडून आघाडीमध्ये बिघाडी होऊ देणार नाही, असे स्पष्टीकरण केले. कोण काय बोलतं त्याकडे लक्ष न देता. काँग्रेसचे प्रमुख नेते आमच्याशी बोलत नाहीत तोवर मी किंवा आमच्याकडून कोणीही याबाबत भाष्य करणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

-अभय देशपांडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR