लातूर : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी येथील मराठा विधीज्ञांनी दि. १ नोव्हेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालय ते उपोषणस्थळ अशी भव्य रॅली काढून आरक्षण प्रश्नी सर्वांचे लक्ष वेधले. खूप झाले आता अंत पाहू नका आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी सरकारला केली. आंदोलनादरम्यान समाजबांधवावर दाखल करण्यात आलेले खटले मोफत लढण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर केला.
मराठा आरक्षणाच्या समर्थनात तर सरकार व पुढा-यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत विधिज्ञ उपोषणस्थळी पोहचले व तिथे त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले. शेतीत उत्पन्न अन् शिक्षणाला पैसा नाही, यामुळे होत असलेल्या आर्थिक व मानिसक कुचबंनेमुळे मराठा युवक आत्महत्या करीत आहेत. याला शासनच जबाबदार आहे. मराठा हा कुणबीच आहे अशा ब्रिटीश आणि निजाम कालीन नोंदी आहेत.
केंद्रात अन् राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. राज्याला शक्य नसेल तर केंद्राला प्रस्ताव पाठवावा दोघांनी मनावर घेतले तर आरक्षण सहज मिळेल परंतु त्यांची इच्छाशक्त्तीच नसल्याने कारणाचा पाढा वाचत चालढकल करीत झुलवत ठेवणे हाच सरकारचा एकमेव कार्यक्रम झाला आहे. परंतु आता आम्ही हे चालू देणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थही बसणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत मेटे, अॅड. रमेश खाडप, अॅड. विजय जाधव, अॅड. सत्तार खान, अॅड. सुनंदा इंगळे (मोटे), अॅड. धनंजय भिसे, अॅड. किरण जाधव, अॅड. अंगद गायकवाड, अॅड. प्रविण पाटील, अॅड. मनोहर रणदिवे, अॅड. कार्ले पाटील, अॅड. उदय गवारे आंिदनी मनोगत व्यक्त केले.