लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत रविवार, २१ जून २०२६ रोजी लातूर जिल्ह्यातील एकूण २६ उपकेंद्रांवर ‘नीट युजी’ परीक्षा पार पडणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिकांची बेकायदेशीर छपाई किंवा इतर गैरप्रकार टाळण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्राच्या १०० किंवा आवश्यकतेनुसार २०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, दुकाने, पानटपरी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ आणि ध्वनिक्षेपक परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदरपासून ते परीक्षा संपेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. तसेच, परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी वगळता पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास आणि शांतता भंग होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीला किंवा वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही. याव्यतिरिक्त, परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे सोबत बाळगून प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
प्रतिबंधात्मक आदेश हे परीक्षेच्या कामकाजासाठी व निगराणीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांना त्यांच्या कर्तव्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र, ही परीक्षा अत्यंत सुरळीत आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील इतर सर्व नागरिकांनी या प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
















