मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकारपाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही ‘समान नागरी कायद्याच्या’ दिशेने मोठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्तराखंड आणि इतर भाजपशासित राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
यापूर्वी शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी देखील महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता गृहराज्यमंर्त्यांनी दिलेल्या या अधिकृत माहितीमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या कायद्याचा अंतिम मसुदा तयार करण्याची जबाबदारी निवृत्त न्यायाधीशांच्या एका विशेष समितीकडे सोपवण्यात आली आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर समाजातील ‘बहु लग्न पद्धती’ पूर्णपणे संपुष्टात येईल. या मुद्द्याचा मुख्य मसुद्यात प्राधान्याने समावेश केला जाणार आहे, जेणेकरून विवाह आणि कौटुंबिक कायद्यांमध्ये सर्वांना समान न्याय मिळेल.
फोन किंवा ईमेलवर तलाक देण्याचे दिवस संपले
नाशिकमध्ये नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक गुन्ह्याचा हवाला देत गृहराज्यमंर्त्यांनी या कायद्याची गरज अधोरेखित केली. नाशिकमध्ये मलिक अस्लम समशेर नावाच्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला फोन/ईमेलवरून तलाक दिल्याचे जाहीर केले आणि अवघ्या ८ दिवसांत त्या महिलेवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
















