मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवसाच्या कामकाजाला आज मंगळवारी (२३ जून) सुरुवात झाली आहे. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आजच्या कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, विविध मुद्द्यांवरून विधानसभेत गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंर्त्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तरे देण्याचे अधिकार देण्याबाबतचा मुद्दा मांडल्यानंतर या मुद्द्यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या मुद्द्यावर विरोधकांमधून जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. ज्या राज्य मंत्र्यांकडे किंवा अन्य मंत्र्यांकडे मंत्री जबाबदारी सोपवत आहेत, ते तरी नीट उत्तर देतात का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात सूचना वाचताना कोणत्या मंत्र्यांचा कारभार कोणाकडे देण्यात आला आहे, याची माहिती दिली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेत म्हटले की, आपण आता जाहीर केले. मात्र, ज्या मंत्र्यांकडे जे खाते आहे, ते मंत्री त्या चर्चा ऐकायला किंवा उत्तर द्यायला नसतील आणि दुसरेच मंत्री त्याची चर्चा ऐकून उत्तर देणार असतील तर खात्याला आणि त्या प्रश्नाला सदस्य जे प्रश्न मांडतात, त्याला ते न्याय देऊ शकत नाही. त्या विषयाचे मंत्री सभागृहात बसले नाही तर कसे होणार? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे जी नावे जाहीर करण्यात आली आहेत, ते मंत्री स्वत:ची जबाबदारी टाळत आहेत, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपण केलेली घोषणा मागे घ्यावी, अशी विनंती जयंत पाटलांनी केली.
मंत्र्यांना संभागृहाचे गांभीर्य नाही : विजय वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही प्रथा पूर्वी नव्हती. परंतु, मागील दोन-तीन अधिवेशन झाले, तेव्हापासून ही नवी प्रथा सुरू झाली आहे. तो आदेश विधानसभा अध्यक्ष देतात म्हणून तो आम्ही ऐकतो. परंतु किती दिवस चालणार? एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत असे होत असेल तर मान्य आहे. मात्र, हे कोणत्या नियमात आहे की, पूर्ण सेशन हे असे लागू करायचे? म्हणजेच या सभागृहाला त्या त्या खात्याचे मंत्री गांभीर्याने घेत नाही, असा त्याचा अर्थ होतो.
















