नांदेड : प्रतिनिधी
ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुंगीचे इंजेक्शन देऊन गोवंशची चोरी करणा-या टोळीला २२ जून रोजी गजाआड केले. याप्रकरणी १७ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून गोवंश चोरून नेण्यासाठी वापरण्यात येणारी इनोव्हा कारसह १५ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, यांच्या पथकाने गोदावरी नदीच्या किना-यावर असलेल्या वाहेद कॉलनी येथील शेख सलीम यांच्या घरावर २२ जून रोजी छापा टाकला. तेथून आरोपी अजीम रौफ गाजी (रा. बैल बाजार, कल्याण जि.ठाणे) सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद सनी अहमद (रा. लेबर कॉलनी, नांदेड) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी अधार्पूर, लिंबगाव, मनाठा, उमरी, कंधार, उस्माननगर,मरखेल, किनवट, मुक्रामाबाद, मांडवी, बिलोली, भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोवंशंना गुंगीचे इंजेक्शन देऊन इनोव्हा वाहनातून वाहतूक करीत विक्री केल्याची कबुली दिली.
या गोवंशच्या विक्रीमध्ये १७ आरोपींचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. १७ पैकी २ आरोपी अटक असून ५ आरोपी आदिलाबाद पोलिसांच्या ताब्यात आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून रोख २ लाख ६२ हजार रुपये, टोयोटा वाहन ( १३ लाख रुपये ), गुंगीचे औषध व सिरींज ( इंजेक्शन ), बनावट नंबर प्लेट (१ हजार ५०० रुपये) असा एकूण १५ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
















