नांदेड: केंद्र व राज्य सरकारची शेतकरी विरोधी धोरणे, अस्मानी-सुलतानी संकटं आणि कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी या विरोधात काँग्रेस पक्षाने जोरदार एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘आसुड मोर्चा’ काढण्यात आला. या भव्य मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
सध्या दररोज आकाशाला भिडणारी महागाई आणि सरकारच्या विविध धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. त्यातच ऐन पेरणीच्या काळात सरकारकडून शेतकरी विरोधी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी जाचक अटी त्यांच्या माथी मारण्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या सर्व परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आणि शेती व शेतकऱ्यांशी संबंधित मागण्यांसाठी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० वाजता नवा मोंढा येथील पक्ष कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात खासदार तथा दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार आणि माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
















