21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटणार

मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटणार

नाशिक : नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरणांमधून जायकवाडी जलाशयात पाणी सोडण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला. मात्र या आदेशास स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध होत आहे. त्यामुळे नाशिक नगर आणि मराठवाडा असा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकीकडे नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊसमान कमी असल्याने आगामी पावसाळा येईपर्यंत नाशिककरांना दुष्काळाची झळ सोसावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत नाशिकच्या लोकप्रतिनिधींकडून विरोध दर्शवला जात आहे.

यंदा राज्यभरात पाऊस कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. नुकतीच राज्य सरकारनेदेखील दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली असून यात नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे. त्यातच जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून सुमारे ८.७ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे याला नाशिकमधील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. त्यामुळे हा पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.
यात नाशिकला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणातून ०.५ टीएमसी म्हणजेच पाचशे दशलक्ष घनफूट, तर दारणा धरण समूहातून २ हजार ६४३ टीएमसी याप्रमाणे प्रमाणे पाणी सोडावे लागणार आहे. मात्र, जेव्हा पाणी सोडण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला, त्या दिवसांपासून शेतक-यांचा पाणी सोडण्यास तीव्र विरोध सुरु आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील विरोध केला असून आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेतून नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचा पाढा वाचला. तसेच शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळत नसल्याने यासंबंधीचा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीसाठी ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. यावर आमदार देवयानी फरांदे यांनी रोष व्यक्त करत पाणी सोडण्यास विरोध केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR