लातूर : प्रतिनिधी
स्वत:च्या मालकीचे बैल असूनही न्यायालयाचे आदेश हातात घेऊन एका गोशाळेच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारावे लागणा-या दोन शेतक-यांना अखेर लातूर पोलिसांनी न्याय मिळवून दिला. न्यायालयाच्या आदेशालाही न जुमानणा-या गोशाळा व्यवस्थापनास कायद्याचे पालन करण्यास भाग पाडत शेतक-यांच्या मालकीचे पाचही बैल परत मिळवून देण्यात आले.
पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा क्र. ११४/२०२६ अंतर्गत प्राणी छळ प्रतिबंध अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात शेतकरी बळीराम नारायण भालेराव व दिनेश आबासाहेब कातळे, रा. रेणापूर यांच्या मालकीचे पाच बैल कायदेशीर प्रक्रियेनंतर परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेत ठेवण्यात आले होते.
संबंधित शेतक-यांनी न्यायालयात अर्ज केल्यानंतर न्यायालयाने जनावरांच्या देखभालीचा खर्च जमा करून बैल तात्काळ परत करण्याचा स्पष्ट आदेश दिला. मात्र न्यायालयाचा आदेश असतानाही गोशाळा व्यवस्थापनाने बैल परत देण्यास नकार दिल्याने शेतक-यांनी अतिरिक्त सत्र न्यायालय, लातूर येथे धाव घेतली. तेथूनही पूर्वीच्या आदेशाची पुनरावृत्ती करून बैल परत करण्याचे निर्देश देण्यात आले. तरीदेखील जनावरांच्या देखभाल खर्चापोटी अतिरिक्त पैशांची मागणी करत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी टाळण्यात आली.
शेवटी हताश झालेल्या शेतक-यांनी थेट पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शेतक-यांची पावसाळ्यातील शेतीकामाची निकड लक्षात घेत तांबे यांनी रेणापूर पोलीस ठाण्याला तातडीने कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इगे यांनी संबंधित शेतक-यांसह प्रत्यक्ष परभणी जिल्ह्यातील गोशाळेत जाऊन न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली. पोलिसांच्या ठाम आणि कायदेशीर भूमिकेमुळे गोशाळा व्यवस्थापनाला अखेर दोन्ही शेतक-यांचे पाचही बैल परत द्यावे लागले.
















