नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध दारू, जुगार, मटका व इतर बेकायदेशीर धंद्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी विशेष मास रेड मोहीम राबवत एकाच दिवशी जिल्हाभर धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७९ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ८ लाख ७७ हजार २४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी एकाच वेळी समन्वयाने ही मोहीम राबविली. शहरासह ग्रामीण भागातील संशयित ठिकाणांवर अचानक छापे टाकून अवैध दारूसाठा, जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले.
कारवाईदरम्यान अवैध दारू प्रकरणी ४५ गुन्हे, तर जुगार व मटका प्रकरणी ११ गुन्हे नोंदविण्यात आले. अवैध दारू प्रकरणात ४७ आरोपींवर कारवाई करून सुमारे ६.२३ लाखांचा, तर जुगार व मटका प्रकरणात ३२ आरोपींवर कारवाई करून २.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
















