पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीतील महत्त्वाचा पक्ष काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. सीपीआयने आयोजित केलेल्या ‘भाजप हटाओ देश बचाओ’ रॅलीत ते म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडीचे सध्या कोणतेही काम चालले नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष व्यस्त आहे. केंद्रातील भाजप सरकारचे स्वातंत्र्याच्या चळवळीशी काहीही देणेघेणे नाही. हे लोक राष्ट्रपिता महात्मा गांधींना विसरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व पक्षांशी सांगितले की, एकजूट व्हा आणि हा देश वाचवा. जे देशाचा इतिहास बदलत आहेत, त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे. म्हणूनच पाटणा आणि इतर ठिकाणी सभा झाल्या. त्यानंतर इंडिया आघाडीची स्थापना झाली.
नितीश कुमार म्हणाले की, सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. काँग्रेसने त्यात जास्त रस घेतला आहे. काँग्रेस पक्षाला पुढे नेण्यासाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करत होतो, पण त्यांना त्याबाबत काळजी नाही. सध्या ते पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. जेव्हा निवडणुका होतील तेव्हा आम्ही सर्वांना स्वतः बोलावू. पण सध्या इंडिया आघाडीचे काम काहीही होत नाही. तसेच नितीश कुमार यांच्या अगोदर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाबाबत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे.