मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहज, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने शहरी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आयुक्तालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय आणि धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
‘शहरी आयुक्तालयाच्या प्रशासकीय संरचना’ आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेच्या आढावा बैठकीत मंत्री आबिटकर म्हणाले की, वेगाने वाढणा-या शहरी लोकसंख्येच्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने शहरी आरोग्य व्यवस्थेचा व्यापक आराखडा तयार केला आहे. प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा वेळेत मिळावी, यासाठी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. शहरस्तरावरील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उणिवा दूर कराव्यात आणि प्रत्येक स्तरावर समाधानाभिमुख कार्यपद्धती स्वीकारावी.
राज्यात सध्या २९ महानगरपालिका आणि ३९९ नगर परिषदा, नगरपंचायती व कटकमंडळे अशा एकूण ४२८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्य सेवा विस्ताराचे काम सुरू आहे. या क्षेत्रांमध्ये २,९३२ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे व ‘आपला दवाखाना’, ८१८ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४४ नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रे तसेच इतर १०५ आरोग्य संस्था कार्यरत आहेत.
नागरिकांना सुलभ, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च ध्येय आहे. शहरी आरोग्य व्यवस्थेच्या सर्वांगीण बळकटीकरणातून प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रभावी आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
















