नाशिक : सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणात सातत्याने होणारे बदल तसेच दिवाळी सणानिमित्ताने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे. सरासरी कांद्याच्या दरात ८०० रुपयांची घसरण झाली आहे.
केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्य दरात ८०० डॉलर प्रति टन किंमत केली आहे. तसेच सरकारने नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मेट्रिक टन कांदा किरकोळ बाजारात विक्रीसाठी आणला आहे.
हा कांदा २५ रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा हा परिणाम कांद्याच्या दरांवर झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी दरात टप्प्याटप्प्याने ८०० ते ९०० रुपयांची घसरण झाली आहे.
कांद्याचे दर हे चार हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितींत दररोज एक लाख क्विंटल कांद्याची आवक होत आहे. गेल्या पाच दिवसांत पाच लाख क्विंटलमागे कांदा उत्पादक शेतक-यांना साधारण ३५ ते ४० कोटी रुपयांचा तोटा बसल्याचे दिसून येत आहे.