लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील खंडापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेली सर्व कामे अपूर्ण आणि अर्धवट राहिली आहेत. ही कामे पुर्ण करण्यात यावी, यासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
जलजीवन मिशन अंतर्गत सर्व कामे अर्धवट राहिल्याने गावातील महिलांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. केंद्र सरकारने लोकांना पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशनची कल्याणकारी योजना राबवली, मात्र ही कामे करणा-या कंत्राटदारांनी सर्व कामे अर्धवट सोडली आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी खंडापूर येथील महिलांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत भिक मांगो आंदोलन करत रोष व्यक्त केला. तर भिक मागून जमलेली रक्कम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मिना यांना देण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.
















