वाढत्या उत्पादन खर्चाचा मोठा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. दूध विक्री दरामध्ये प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. केवळ दूधच नाही, तर बाजारातील विविध दुग्धजन्य पदार्थांच्या दरामध्येही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. ही नवीन दरवाढ ११ ऑगस्ट (मंगळवार)पासून लागू झाली. त्यामुळे ग्राहकांना आता दुधासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत दूध व्यवसायावर पडत असलेल्या वाढत्या आर्थिक बोजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांची झालेली वाढ, साखरेच्या दरात प्रतिकिलो १२ रुपयांची झालेली वाढ आणि पॅकिंगच्या एकूण खर्चात झालेली ३० टक्क्यांहून अधिक वाढ यामुळे दुग्ध व्यवसायाची प्रक्रिया आणि वाहतूक खर्च कमालीचा वाढल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय, अलिकडे दूध खरेदी दरात झालेली वाढ आणि आगामी काळात दूध खरेदी दरामध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊनच अखेर हा दरवाढीचा निर्णय घ्यावा लागल्याचे दूध संघांकडून सांगण्यात आले. सहकारी आणि खासगी दूध संघांचे सुमारे २० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. डिझेल, साखर आणि पॅकिंग साहित्याच्या दरवाढीमुळे ओढवलेल्या या संकटामुळे दूध संघांना हा दरवाढीचा निर्णय घेणे भाग पडले असून, याचा थेट परिणाम आता गृहिणींच्या बजेटवर होणार आहे. ‘गोकुळ’ने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपये तर गाय दूध खरेदी दरात एक रुपया दरवाढ केली आहे. ही दरवाढ मंगळवार (११ ऑगस्ट) पासून लागू झाली. म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली आहे. गायीच्या दूध विक्रीदरात वाढ केलेली नाही. गोकुळ संलग्न ७५०० दूध संस्थांच्या माध्यमातून दररोज १४ ते १५ लाख लिटर दूध संकलन केले जाते. यंदा पावसाळा लांबला असून अनेक ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे ओल्या चा-याची कमतरता निर्माण झाली आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला. याचा आर्थिक फटका शेतक-यांना बसत असल्याने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय ‘गोकुळ’ने घेतला. विक्री दरातील वाढ ही कोल्हापूरसह पुणे, मुंबईसाठीही लागू असणार आहे. दूध खरेदी दरात यापूर्वीच वाढ झाली आहे. पुढील काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे खरेदी प्रक्रिया, वेष्टन आणि वाहतूक दरात झालेल्या दरवाढीचा विचार करून दूध विक्री दरात प्रतिलिटर २ रुपये आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव ऐन तोंडावर आलेला असताना साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात साखरेची सरासरी किंमत ४७.१७ रु. प्रति किलो होती, ती आता वाढून ५०.३० रु. झाली आहे. गत वर्षाच्या तुलनेत साखरेच्या दरात सुमारे ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गत काही दिवसांपासून महागाई ठराविक अंतराने वाढताना दिसत आहे. कधी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होते, तर कधी भाजीपाला महाग होतो. कधी घरगुती वापराचे तेल महागते तर कधी एलपीजीच्या किमती वाढताना दिसतात. संघटनेने दुग्धजन्य पदार्थांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विविध दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असू शकतो. दुधाच्या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या, विशेषत: जे दररोज मोठ्या प्रमाणात दूध खरेदी करतात, त्यांच्या घरगुती बजेटवर होऊ शकतो. इतकेच नाही तर, दुधाच्या दरवाढीमुळे दही, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही वाढ होऊ शकते.
यापूर्वी मे महिन्यात अमूल, मदर डेअरी, सुधा आणि जयपूर डेअरी यांनीही देशभरात दुधाच्या दरात वाढ केली होती. त्यावेळी कंपन्यांनी सांगितले होते की, त्यांना वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत असल्याने ही दरवाढ आवश्यक झाली आहे. दरवाढ पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर झाली आहे. कारण इराण-अमेरिका युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक विस्कळीत झाली असून पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इराण-अमेरिका युद्ध अद्याप संपलेले नाही. होर्मुझ सामुद्रधुनी करारासंदर्भात ओमान आणि इराण यांच्यात चर्चा सुरू आहे. जर होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जलवाहतूक पुन्हा सुरू झाली, तर तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. दुधाच्या नव्या दरवाढीमुळे गायीच्या दुधाचा दर ६२ रुपये आणि म्हशीच्या दुधाचा दर ७८ रुपये प्रतिलिटर झाला आहे. यापूर्वी गायीचे दूध ६० रुपये आणि म्हशीचे दूध ७६ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. दरम्यान, दुधासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने गेल्या महिन्यात संसदेत स्पष्ट केले होते.
दुधाचे दर बाजारातील परिस्थितीनुसार सहकारी संस्था आणि खासगी डेअ-यांकडूनच निश्चित केले जातील, असे सरकारने सांगितले आहे. दूध दरवाढीसाठी वाढता उत्पादन खर्च आणि प्रक्रिया खर्च हे प्रमुख कारण असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. डिझेलच्या किमतीतील वाढ, वाहतूक खर्च तसेच दूध पॅकेजिंगच्या वाढलेल्या खर्चामुळे डेअरी उद्योगावर आर्थिक दबाव वाढला आहे. यावेळी करण्यात आलेली ही दरवाढ महाराष्ट्रातील दूध बाजारासाठी लागू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातील ग्राहकांवर एकाच वेळी या निर्णयाचा परिणाम होणार नाही. पेट्रोल-डिझेल, भाजीपाला आणि घरगुती वस्तंूच्या किमतीतील चढ-उतारानंतर आता दूध महागल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे. विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक किंवा नियमितपणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करणा-या कुटुंबांना या दरवाढीचा अधिक परिणाम जाणवू शकतो.
















