मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आता सुटे खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सुट्या तेलाची विक्री करणा-या घाऊक अथवा किरकोळ विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे. कायद्याचे उल्लंघन करणा-या व्यक्तीला ७ वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकेल. ३ लाखांपासून ते १० लाख रूपयांपर्यंतचा दंड देखील यासाठी ठोठावण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील सुटे खाद्यतेल खरेदी करू नये असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. सर्व खादयतेल उत्पादक ते विक्री करणा-यांना हा नियम लागू असणार आहे.
तुकाराम मुंढे यांनी पत्रकारपरिषदेत आज याची घोषणा केली. २०११ ला आपले एफएसएसआयचे कायदे आले त्यानुसार परवाना असणे व नियमन पाळणे अपेक्षित असल्याचे सांगून तुकाराम मुंढे म्हणाले, आपण याबाबत तपासणी केली. त्यात बारा प्रमुख त्रुटी आढळल्या. खाद्यतेल निर्मात्या अनेक उत्पादकांकडे लायसन्स, रजिस्ट्रेशन नाही. खादयतेलात मोठया प्रमाणात भेसळ आढळली. अॅसिडिक, औद्योगिक ट्रान्स फॅट आढळले. तेलाचा खरा स्त्रोत तसेच उत्पादन दिनांक लपविण्यात येते. मुदत संपलेले तेल पुन्हा पॅक करून विकण्याचा प्रकार घडतो. अॅगमार्क शिवाय तेल विक्री केले जाते. सुट्या प्रकारात खाद्यतेल विक्री केली जाते. फूड ग्रेड मटेरियल नसलेल्या वेष्टनाचा वापर केला जातो. घातक खनिज तेलाची वाहतूक झालेल्या टँकरमधूनच या खादयतेलाची वाहतूक करण्यात येते. गंजलेल्या कॅनमध्येच पुन्हा तेलाचे पॅकिंग करण्यात येते. २०२५-२६ मध्ये आपण १२४७ खाद्यतेल नमुने तपासले त्यापैकी स्टँडर्ड ११४२ आढळले, सबस्टँडर्ड ७७ केसेस झाल्या तर १३ अनसेफ सापडले. त्यामुळे आता आपण खाद्यतेलाबद्दल विशेष आदेश काढले असल्याचे तुकाराम मुंढे म्हणाले.
सुट्या तेलावर प्रतिबंध का?
सुट्या खादयतेल विक्रीवर प्रतिबंध का करण्यात आला याचे कारण सांगताना तुकाराम मुंढे म्हणाले, सुटे तेल किती तारखेला उत्पादित झाले, कोणी केले, कुठून आले याची कोणतीच माहिती मिळत नाही. त्यात कोणते घटक आहेत हे देखील कळत नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करताना अडचण येते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता उत्पादकांना रजिस्ट्रेशन, लायसन्स बंधनकारक असेल. खाद्यतेलाची विक्री केवळ सीलबंदच करता येईल. सुटे तेल विकता येणार नाही. सुट्या पद्धतीने तेल पाठविणारा उत्पादक अथवा वितरक हा मूळ उल्लंघनकरता असतो. किरकोळ विक्रेत्याने विनासील अथवा छेडछाड नसलेले पॅकेट नाकारणे आवश्यक आहे. त्यांनी केले नाही तर ते देखील जबाबदार धरले जातील. मोहरीचे तेल शंभर टक्के शुद्धच विकावे लागेल. ज्यात पॅकेजिंग केले जाते ते फूडग्रेडच असले पाहिजे.
तळणीच्या तेलाची शुद्धता आवश्यक
वापरलेल्या किंवा गंजलेल्या डब्यातच पॅकेजिंग केले जाते. त्यावरही आता बंदी घालण्यात आली आहे. तळणीच्या तेलाचा वारंवार वापर होतो. वारंवार तापविल्याने हानीकारक ट्रान्सफॅट तयार होतात. त्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे आता तळणीच्या तेलाची देखील शुदधता व दर्जा सांभाळणे बंधनकारक करण्यात आल्याचे तुकाराम मुंढे म्हणाले.
















