मुंबई : प्रतिनिधी
वाहिन्यांवर आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात सध्या एका मोठ्या मानसिक धक्क्यातून जात आहे. एका नामांकित कुरिअर कंपनीच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी वनिताला लक्ष्य केले असून, तिचे व्हॉट्सअॅप हॅक केले आहे.
वनिता म्हणाली की, तिला एका अज्ञात नंबरवरून फोन आला. समोरील व्यक्तीने आपण ‘ब्लू डार्ट’ कुरिअर कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे एक पार्सल आले आहे, पण डिलिव्हरी बॉयला तुमचा पत्ता सापडत नाहीये. मी सांगतो त्या नंबरवर तुमचा पत्ता पाठवा, असे त्या फोनवर सांगण्यात आले.
वनिताने सुरुवातीला संशय व्यक्त केला की, माझा पत्ता आधीच अॅपवर सेव्ह असतो, मग असे कसे होईल? मात्र, समोरील व्यक्तीने वारंवार फोन केल्यामुळे विश्वासाने वनिताने त्याने दिलेला नंबर डायल केला. हा नंबर डायल करताच अवघ्या काही सेकंदांत वनिताच्या फोनमधील व्हॉट्सअॅप आपोआप लॉगआऊट झाले आणि हॅकर्सनी तिच्या अकाऊंटवर पूर्ण ताबा मिळवला.
अडचणीचे नाटक करून मागितले ६२ हजार रुपये
हॅकर्स एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी वनिताचे येणारे सर्व कॉल्स त्यांच्या नंबरवर वळवले (कॉल फॉरवर्डिंग), ज्यामुळे तिला कोणाचे फोन येणे बंद झाले. त्यानंतर हॅकर्सनी वनिताच्या व्हॉट्सअॅपवरून तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. मी सध्या खूप मोठ्या अडचणीत अडकले आहे, मला तातडीने मदत हवी आहे. कृपया मला ६२ हजार रुपये पाठवा, असा मेसेज हॅकर्सनी फिरवला. वनिता खरोखरच संकटात असावी या काळजीपोटी तिच्या काही जवळच्या मित्रांनी कोणताही विचार न करता हॅकर्सनी दिलेल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर देखील केले.















