जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपत असून, उद्यापासून अंतरवाली सराटी येथे निर्णायक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
सरकारकडून मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले नसल्याचे सांगितले जात असल्याचा उल्लेख करत जरांगे म्हणाले की, ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनी पुढे यावे. तसेच ज्यांनी अर्ज घेऊन कार्यालयात गेले, मात्र अधिका-यांनी अर्ज स्वीकारला नाही, अशा बांधवांनीही अंतरवालीत यावे. आज दिवसभर आणि रात्रभर अंतरवालीत येण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही किंवा अर्ज स्वीकारण्यात आलेला नाही, अशांनीही अंतरवालीत यावे, असे जरांगे यांनी सांगितले. तसेच ज्यांची व्हॅलिडिटी थांबवण्यात आली आहे, त्यांनीही आंदोलनाच्या ठिकाणी यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजातील बांधवांनी घरात बसून राहू नये, तर घराबाहेर पडून अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. वंशावळ सापडली, मात्र महसुली पुरावा उपलब्ध नसेल तर काय करायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘वावर नाही म्हणून आम्ही मराठे नाही का?’ असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली.
मराठ्यांनो जागे व्हा
मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालेले नाही. सरकार आपल्या लेकरांचे वाटोळे करत असल्याचा आरोप करत मराठ्यांनी जागे व्हावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. मात्र आंदोलनादरम्यान कोणत्याही मराठा तरुणाने आत्महत्या करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘मराठ्यांच्या कुठल्याही लेकराने आता आत्महत्या करायच्या नाहीत, मी इथे बसलोय,’ असे ते म्हणाले.
गरज पडली तर वर्षा बंगल्यावर येऊन बसेन
सरकारने मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होण्याचे संकेत जरांगे यांनी दिले. ‘मी वर्षा बंगल्यावर येऊन बसेन,’ असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे उद्यापासून सुरू होणा-या अंतरवाली सराटीतील आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
















