परभणी : परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी महाराष्ट्र ब्राह्मण संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. याबाबत ११ जानेवारी पर्यंत शासन आदेश न काढल्यास १४ जानेवारीपासून छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज शनिवार, दि. ६ जानेवारी रोजी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र ब्राह्मण समाज संघटनेचे मुख्य समन्वयक सुरेश मुळे, सचिन वाडे, पाटील, गजानन जोशी, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, निखिल लातुरकर, आलोक चौधरी, वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष दिलीप जोशी, विजय उर्फ बंडूनाना सराफ, विठूगुरु वझुरकर, योगेश जोशी सोनपेठकर, संजय सुपेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या वतीने अनेक वेळा शासन दरबारी जिल्हा तालुकास्तरावर निवेदने, मोर्चा, आंदोलने व उपाशी उपोषणे करण्यात आली आहे. मात्र गेल्या १५ वर्षापासून ब्राह्मण संघटनांच्या पदरात काहीही पडलेले नाही.
अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले असून परशुराम आर्थिक विकास महामंडळाबाबत शासन दरबारी अधिकृत अशी कोणतीही घोषणा झालेली नाही.त्याबाबत कोणत्याही शासन आदेशही काढण्यात आलेला नाही. त्यामुळे ब्राह्मण समाज संभ्रमात आहे. आर्थिक विकास महामंडळाबरोबरच मंदिरांच्या जमिनींच्या मालकी बाबाचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच ब्राह्मण समाजाबाबत विडंबन करणा-या विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी अधिकृत शासनाचा जीआर किंवा परिपत्रक काढावे यासह विविध मागण्यांचे निवेदन राज्य शासनाला देण्यात आल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
यावेळी सुरेश मुळे, बाजीराव धर्माधिकारी, दिलीप जोशी, सचिन वाडे, विजय पिंगळे यांनी पत्रकारांना माहिती दिली. परशुराम आर्थिक विकास महामंडळाबाबत राज्य शासनाने ११ जानेवारी पर्यंत आदेश न काढल्यास छत्रपती संभाजी नगर येथे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर सर्व ब्राह्मण समाज संघटना ढोल बजाओ आंदोलन करणार आहे. आर्थिक विकास महामंडळाची अधिकृत घोषणा होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी माहिती यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आली.