जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमकरीत्या प्रचाराला सुरवात केली आहे. दिग्गजांचे नामांकन सुरू असतानाच पक्षांतराचा खेळही सूरच आहे. दरम्यान, राजस्थानच्या फायर ब्रँड नेत्या माता आनंदी सरस्वती यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. काँग्रेस त्यांना अजमेर उत्तरमधून तिकीट देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखजिंदर सिंग रंधावा यांनी माता आनंदी सरस्वती यांना पक्षाचे सदस्यत्व दिले.
अजमेर उत्तर विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला मनाला जातो. दीर्घकाळापासून काँग्रेसला येथून पराभवाचा सामना करावा लागत आहे. भाजपचे दिग्गज नेते वासुदेव देवनानी दीर्घकाळापासून येथून निवडून येत आहेत. त्यामुळे काँग्रेसने आता भाजपच्या या सुरक्षित जागेवर डल्ला मारण्याच्या तयारीत आहे. या जागेवरून काँग्रेस माता आनंदी सरस्वती यांना तिकीट देऊ शकते.
माता आनंदी सरस्वती यांचे खरे नाव ममता कलानी असून त्या मूळच्या सिंधी समाजातील आहेत. त्या सीडब्लूसी सदस्य मोहन प्रकाश यांच्या कुटुंबातील आहेत. अजमेर उत्तर मतदारसंघावर सिंधी समाजाचा मोठा प्रभाव आहे, त्यामुळे वासुदेव देवनानी यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी काँग्रेस फायर ब्रँड सिंधी चेहरा उभा करू शकते. यानंतर या जागेवरील लढत रंजक ठरू शकते.