नांदेड : प्रतिनिधी
कौटुंबिक त्रासाला आणि पत्नी नांदायला येत नसल्याने, कंटाळलेल्या मूकबधिर पतीने लोहा शहरातील उंच मोबाईल टॉवरवर चढून सोमवारी अनोखे आंदोलन केले. विशेष म्हणजे, या तरुणाने हातात आपल्या लग्नाचा फोटो असलेला बॅनर घेतला होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली असून, पोलिसांसह स्थानिक नागरिकांकडून त्याची समजूत काढून सुरक्षितपणे खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू होते. दुपारपर्यंत हे प्रयत्न सुरूच होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण शादुल मगदूम दौलताबादी (रा. बेटमोगरा, ता. मुखेड) मूकबधिर असून त्याची पत्नीही मूकबधिर आहे. तो सध्या लोहा येथे आपल्या सासरवाडीत राहत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, सासरच्या मंडळींकडून सातत्याने मारहाण केली जात असून घरात राहू दिले जात नसल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या कौटुंबिक त्रासाला कंटाळून त्याने सोमवारी थेट मोबाईल टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला.
या घटनेचे आणखी एक धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे, सुमारे वर्षभरापूर्वीही या तरुणाने याच मोबाईल टॉवरवर चढून अशाच प्रकारे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही त्याची समजूत काढून त्याला खाली उतरविण्यात आले होते. मात्र, कौटुंबिक वाद आणि कथित त्रास कायम राहिल्याने त्याने पुन्हा टॉवरवर चढून आपला संताप व्यक्त केला.
यावेळी हातात लग्नाचा फोटो असलेला बॅनर घेऊन सोमवारी सकाळी तो टॉवरवर बसल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाशी संवाद साधून त्याची समजूत काढण्याचे तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
दरम्यान, मूकबधिर तरुणाच्या कौटुंबिक परिस्थितीची चौकशी करून त्याच्या आरोपांची सत्यता तपासणे आवश्यक आहे. कौटुंबिक वादातून पुन्हा पुन्हा अशा प्रकारे जीव धोक्यात घालण्याची वेळ येत असल्याने संबंधित यंत्रणांनी या प्रकरणात गांभीयार्ने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
















