दुबई : वृत्तसंस्था
महिला आशिया कप २०२६ मधील दुस-या सेमीफायनलमध्ये श्रीलंका महिला संघाने पाकिस्तानवर ४ विकेट्सने मात केली. शेवटपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांकडे विजयाची समान संधी होती. मात्र, अखेर श्रीलंकेने बाजी मारत सलग तिस-यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका पुन्हा भिडणार आहेत.
आज झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १३०-५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंका संघाने १८.४ ओव्हरमध्ये १३४-६ धावा करत हे लक्ष्य पूर्ण केले. आता आशिया कपच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा भारत आणि श्रीलंका एकमेकांना भिडणार आहेत. भारताच्या वाघिणी मागील फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
या सामन्यात पाकिस्तान संघाकडून कर्णधार फातिमा सना हिने नाबाद ४७ धावांची खेळी केली होती. त्यासोबतच शवाल झुल्फिकारने २४ धावा आणि गुल फिरोझाने २१ धावा केल्या होत्या. बाकी फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत याचाच फटका पाकिस्तान संघाला बसला. पाकिस्तानच्या १३१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाला फातिमा सना हिने एकाच ओव्हरमध्ये दोन झटके दिले. चमारी अटापट्टू आणि संजना काविंदी यांना माघारी पाठवर बॅकफूटला ढकलले होते. मात्र हर्षिता समरविक्रमा आणि काविशा दिलहारी यांनी पाचव्या विकेटसाठी ५९ चेंडूत ६७ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. हर्षिताने ३६ धावा आणि काविशाने ३३ धावा केल्या. त्यानंतर शेवटी निलाक्षी डी सिल्वाने १० चेंडूत ३ चौकार मारत नाबाद १८ धावा केल्या तर कौशिनीने ४ चेंडूत नाबाद १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
















