नांदेड : प्रतिनिधी
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवरून होणा-या टीका आणि राज्यातील डीजे बंदीच्या निर्णयाबाबत गौतमी पाटीलने नांदेडमध्ये मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. टीकाकार आणि डीजे बंदीवर मला काहीच बोलायचं नाही, असे म्हणत तिने या दोन्ही विषयांवर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
नांदेडमध्ये आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील आली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिला तिच्या विरोधात झालेल्या पोलीस तक्रारीसह डीजे बंदीबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या विषयांवर भूमिका स्पष्ट करण्याचे तिने टाळले. टीकाकारांबद्दल काही बोलायचं नाही आणि मी त्याबद्दल काही बोलत नाही. डीजे बंदीबद्दलही मी काही बोलू शकत नाही. धन्यवाद, अशा मोजक्या शब्दांत गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली
.
दरम्यान, नांदेडमधील दहीहंडी कार्यक्रमातील एक भावनिक प्रसंगही गौतमी पाटीलने सांगितला. कार्यक्रम सुरू असताना एका चिमुकलीने आपल्याला अंगठी आणून दिल्याचे तिने सांगितले. मी स्टेजवर होते. खूप गर्दी होती. तरीही ती चिमुकली माज्याजवळ आली. तिने मला डान्स करायचा आहे, असे सांगितले. तिने डान्स केला आणि मला अंगठी दिली. हे तिचं प्रेम आहे, असे गौतमी पाटील म्हणाली. चिमुकलीने गदीर्तून पुढे येत गौतमी पाटीलला दिलेली अंगठी आणि तिच्यासोबत केलेला डान्स हा कार्यक्रमातील विशेष क्षण ठरला.
लाठीचार्जच्या प्रश्नावर पोलिसांचे समर्थन
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये होणारी मोठी गर्दी आणि काही ठिकाणी निर्माण होणा-या परिस्थितीबाबतही तिला प्रश्न विचारण्यात आला. लाठीचार्जबाबत विचारले असता तिने, तसं काही नाही, कधी कधी या गोष्टी होत असतात, अशी प्रतिक्रिया दिली. पोलिसांच्या भूमिकेबाबत बोलताना गौतमी पाटीलने पोलिसांचे सहकार्य असल्याचे सांगितले. पोलिसांचं नेहमी सहकार्य असतं. पोलीस जसं म्हणतील तसं झालं पाहिजे. पोलीसही आपले आणि प्रेक्षकही आपले, असे ती म्हणाली.
नांदेडमधील दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या या प्रतिक्रियांकडे उपस्थितांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधले. टीका, डीजे बंदी आणि कार्यक्रमातील गर्दी या मुद्द्यांवर तिने संयमित भूमिका घेत थोडक्यात प्रतिक्रिया देणे पसंत केले.
















