नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेकडून दहीहंडीच्या निमित्ताने लाखो रुपयांची उधळण करत नाच-गाण्यांचा जल्लोष सुरू असताना शेतकरी पुत्रांनी रविवारी दि. १३ रोजी दुष्काळी दहीहंडी फोडून सत्ताधा-यांच्या उत्सवी दिखाव्याला चपराक दिली. एका बाजूला सत्ताधा-यांचे भपकेबाज कार्यक्रम आणि दुस-या बाजूला पावसाच्या प्रतीक्षेत करपणारी शेती, अशी विदारक परिस्थिती अधोरेखित करत शेतकरी पुत्रांनी समाजभान जपत सरकारचे लक्ष दुष्काळाकडे वेधले.
राजकीय दहीहंडीतील अश्लील नाच-गाण्यांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अध:पतनाचे प्रदर्शन होत असल्याबद्दलही यावेळी तीव्र दु:ख व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकरी व त्यांच्या पुत्रांनी अधार्पूर तालुक्यातील भोकर फाटा येथे रविवार १३ सप्टेंबर सकाळी ११ वाजता एकत्र येत आपल्या शेतातील सुकलेले सोयाबीन, कापूस आणि खराब झालेल्या केळींचा काला करून दहीहंडी साकारली. पाऊस पडू दे, शेतकरी वाचू दे अशी आर्त हाक देत श्रीकृष्णाला साकडे घालण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकश्र्यांना मदत द्यावी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. दुष्काळाची दाहकता सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पारंपरिक उत्सवाला संघषार्चे स्वरूप देण्यात आले.
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढावा, संपूर्ण कर्जमाफी करावी, वैधानिक विकास महामंडळाचे पुनर्गठन करून अध्यक्ष नेमावा, पीकविम्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, काँग्रेसचे संदीपकुमार देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, सदाशिवराव देशमुख, दादाराव पुयड, पिंटू पाटील वासरीकर, संतोष गव्हाणे, दीपक मगर, भगवानराव मनूरकर, शंकरराव राजेगोरे, मधुकर राजेगोरे, मारोतराव भांगे, भगवान पवार, किसनराव कदम, अशोक बुटले, बाळासाहेब आंबेगावकर, डॉ. उत्तमराव इंगळे, सदाशिव इंगळे, नितेश लोणे, विठ्ठल कल्याणकर, महेश राजेगोरे आदी उपस्थित होते.
















