नांदेड : प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव व श्री विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी संयुक्तपणे शहरातील प्रमुख ५ विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या दौ-यात उपमहापौर दिपकसिंह रावत, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील यांच्यासह मनपाचे इतर वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी कमी असल्याने, नागरिकांनी व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या पाहणी दौ-यादरम्यान महापौर आणि आयुक्त यांनी एकूण ५ प्रमुख स्थळांना भेटी देऊन आवश्यक त्या सुधारणा व व्यवस्थेचे निर्देश दिले. आसना नदी परिसर (पासदगाव व सांगवी) या दोन्ही ठिकाणी कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यासंबंधीच्या कामांचा विशेष आढावा घेण्यात आला.
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती आणि तेथील सोयीसुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे पुयनी व झरी खदान परिसर या दोन्ही खदान परिसरात मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. मोठ्या मूर्तींचे विसर्जन सुरक्षितपणे व्हावे यासाठी रॅम्प, क्रेन आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच गोदावरी नदीच्या मुख्य नावघाट विसर्जन स्थळाला भेट देऊन तेथील घाटांची स्वच्छता, डागडुजी आणि मार्गांच्या दुरुस्तीची पाहणी करण्यात आली.
या प्रत्यक्ष पाहणी दौ-यात महापौर, उपमहापौर व आयुक्तांसोबत मनपाचे अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त गंगाधर इरलोड, उपायुक्त स.अजितपालसिंग संधु, शहर अभियंता सुमंत पाटील, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादिक, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, संघरत्न सोनसळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिट्ठे, क्षेत्रिय अधिकारी डॉ. मिर्झा बेग, रावण सोनसळे, राजेश जाधव, नागनाथ पतंगे, गौतम कवडे, विठ्ठल तिडके, उपअभियंता खुशाल कदम, सतीश ढवळे, अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे आदी उपस्थित होते.
















