नांदेड : प्रतिनिधी
भाजपमध्ये गेलात ना, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊन मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावा. शेतक-यांचे आणि दुष्काळाचे प्रश्न सोडवा. मोदींना मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यास सांगा. त्यानंतर आम्ही समजू की तुम्ही खरोखर मराठवाड्याच्या विकासासाठी भाजपमध्ये गेला आहात, अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते तथा खा.संजय राऊत यांनी खा.अशोक चव्हाण यांच्यावर केली होती. राऊत यांच्या या टीकेला अशोक चव्हाण यांनी मुदखेड येथून पलटवार करत ही त्यांची शेवटची तडफड आहे, असे जोरदार प्रत्युत्तर दिले.
नांदेड शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या जनआंदोलनात खा.संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांनी आता मोदींकडे जाऊन मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आग्रह धरावा, अशी भूमिका राऊत यांनी मांडली. राऊत यांनी मराठवाड्यातील शेतकरी आणि दुष्काळाच्या प्रश्नाचा उल्लेख करत भाजप नेते खा. अशोक चव्हाण यांच्यावर थेट टीका केली. अशोक चव्हाण भाजपात गेले ना, मग जा आता मोदींकडे मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावा. शेतक-यांचे, दुष्काळाचे प्रश्न मार्गी लावा. मोदींना सांगा, कोरडा दुष्काळ जाहीर करा. मग आम्ही समजू हो, तुम्ही खरोखर मराठवाड्याच्या विकासासाठी भाजपात गेलात, असे राऊत म्हणाले होते.
दरम्यान, राऊत यांच्या या टीकेला खा.अशोक चव्हाण यांनी मुदखेडमध्ये आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमातून उत्तर दिले. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. त्यामुळे दुसरा-तिसरा काही विषय नाही. यांची शेवटची तडफड सुरू आहे, असा पलटवार चव्हाण यांनी केला.यावेळी चव्हाण यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांच्या दौ-यांवरही टीका केली. जिल्हा-जिल्ह्यात जायचे, काही तरी काड्या करायच्या आणि काही तरी उलटसुलट बोलायचे, याशिवाय लोकांमध्ये यांचा काही संबंध नाही, असा आरोप त्यांनी केला. कधी आले होते का नांदेडला? कधी आले होते का तुमच्या सुख-दु:खात? निवडणुकीपुरते तुमच्याकडे येणारे हे नेते आहेत. नंतर तुमच्याकडे कोणी येणार नाही. येणार तर फक्त अशोक चव्हाण येणार, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत यांच्या टीकेनंतर अवघ्या काही दिवसांत अशोक चव्हाण यांनी मुदखेडमधून दिलेल्या प्रत्युत्तरामुळे नांदेडच्या राजकीय वतुर्ळातील आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली आहे. राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेशाच्या मुद्द्यावरून मराठवाड्याच्या प्रश्नांची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर सोपवण्याचे आव्हान दिले, तर चव्हाण यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून उबाठा गटावरच निशाणा साधला. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आगामी काळात नांदेडच्या राजकारणात भाजप, शिंदे शिवसेना आणि उबाठा यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
















