सरकार शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी
पाऊस बेपत्ता झाल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पडले आहे. दीड महिन्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने पिके धोक्यात आली आहेत. मूग, सोयाबीन, उडीद, कापूस तूर व अन्य पिके सूकण्याच्या मार्गावर आहेत. कमी पावसामुळे शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येण्याची चिन्हे आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सध्याच्या पावसाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. सरकारने टंचाई, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. राज्य सरकार शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांना मदतीची तयारी सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठवाड्यासह जवळपास अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट पडले असून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसाच्या स्थितीबाबत जवळपास पाऊणतास चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्याचे सादरीकरण झाले. कुठल्या तालुक्यात काय स्थिती आहे, पावसाचा खंड किती याची माहिती देण्यात आली. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. टंचाई, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. एनडीआरएफच्या निकषांनुसार आपल्याला सर्व्हे ५ ऑक्टोबरनंतर करावा लागतो. त्याच्या आधीचा सर्व्हे मदतीकरिता पात्र होत नाही. पण आपण ५ ऑक्टोबरपर्यंत थांबणार नाही. मदतीच्या उपाययोजनांची माहिती घेण्यास सुरूवात केली. ५ ऑक्टोबरचा सर्व्हेही करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आदी ठिकाणी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे भीषण दुष्काळाचे सावट आहे.
दुष्काळ निवारणाच्या
उपाययोजनांची तयारी
अनेक जिल्ह्यांत पावसाचा ताण ३० दिवसांवर गेला आहे. टंचाई, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकार शेतक-यांंना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांना संपूर्ण मदत करण्याची तयारी सुरू केली असून त्याचा आराखडाही तयार करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
















