सर्वसामान्य, छोट्या व्यापा-यांना सूट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने यूपीआयवर एमडीआर अर्थात मर्चंट डिस्काऊंट रेट लागू करण्याची घोषणा केली आहे. आज यूपीआय संचालन समितीची बैठक झाली. यात २ हजार रुपयांपेक्षा जास्तीचा व्यवहार केल्यास ०.४ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. १५ ऑक्टोबरपासून निर्धारित मर्चंट व्यवहारांवर एमडीआर लागू होणार आहे. दरम्यान, यूपीआयच्या एमडीआरमधून सामान्य लोक आणि छोट्या व्यापा-यांना वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आता एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीला पैसे पाठविले तर त्यावर एमडीआर शुल्क आकारले जाणार नाही. हा एमडीआर फक्त सरकारने निर्धारित केलेल्या व्यापारी आणि व्यावसायिकांनाच लागू असणार आहे. निवडक मर्चंट व्यवहारांवर सुधारित यूपीआय मर्चंट डिस्काऊंट रेट रचना लागू करण्यात आली आहे. ही १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होईल. तसेच ग्राहकांसाठी म्हणजेच लोकांसाठी यूपीआय पूर्णपणे मोफत राहील. या पद्धतीत २ हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे ९५ टक्के कमी मूल्याचे यूपीआय व्यवहार आणि लहान मर्चंट व्यवहार पूर्णत: मोफत ठेवले आहेत.
छोट्या व्यापा-यांमध्ये यूपीआयचा विस्तार करण्यासाठी एका नवीन निधीचा प्रस्ताव मांडला आहे. हा उपक्रम यूपीआयचा वापर वाढवेल. कायमच्या वापरास प्रोत्साहन देईल आणि भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये लहान व्यवसायांचा समावेश जलद करेल. मोठ्या मूल्याच्या व्यवहारांवरील वाजवी एमडीआर शुल्क यूपीआय इकोसिस्टममधील घटकांमध्ये वितरित केले जाईल. ज्यामुळे नवीन वापरकतर्ते व मर्चंटस्पर्यंत यूपीआयचा विस्तार, सायबर सुरक्षा आणि नवनिर्मितीमध्ये गुंतवणूक सुनिश्चित होईल, असे सरकारने म्हटले आहे.
२ हजारांपर्यंतचे व्यवहार
एमडीआर कक्षेबाहेर
ग्राहक आतापर्यंत करीत आल्याप्रमाणे यूपीआयचा वापर करून मोफत व्यवहार करीत राहतील. व्यक्ती ते व्यक्ती व्यवहार आणि २ हजार रुपयांपर्यंतचे व्यक्ती ते व्यापारी व्यवहार एमडीआरच्या कक्षेबाहेर असणार आहेत. व्यक्ती ते व्यापारी रचनेअंतर्गत काम करणा-या लहान मर्चंटस्ना शून्य एमडीआर असेल. या श्रेणीतील व्यापारी थेट त्यांच्या खात्यांत यूपीआय क्यूआर पेमेंटस्द्वारे दरमहा १ लाखापर्यंत रक्कम स्वीकारू शकतील.
असे असेल एमडीआर शुल्क
रक्कम लागू एमडीआर व्यापा-याला एमडीआर
२००० ०
३००० ०.४ टक्के १२ रुपये
५०,००० ०.४ टक्के रु. २००
७५००० किंवा अधिक फिक्स ३००
एमडीआरची कमाल
मर्यादा ३०० रुपये
रेल्वे, दूरसंचार सेवा, विमा आणि इंधन यासारखअया नियुक्त मर्चंट श्रेणीत २ हजार रुपयांपेक्षा जास्त यूपीआय पेमेंटस्वर प्रति व्यवहार ५ रुपयांचा फ्लॅट एमडीआर लागू होईल. २ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या पी २ एम यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर लागू होईल. ज्याची कमाल मर्यादा प्रतिव्यवहार ३०० रुपयांच्या मर्यादित राहील, असे सांगण्यात आले.
यूपीआय शुल्कावरून
काँग्रेस आक्रमक
यूपीआय व्यवहारावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यापारी यूपीआय व्यवहाराचा थेट भार ग्राहकांवर पडणार नसला तरी व्यापारी वस्तूंच्या किमतीतून ग्राहकांकडून वसूल करू शकतात. या निर्णयामागे अमेरिकन पेमेंट कंपन्यांचा दबाव असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
















