नागपूर : राज्यात उद्भवलेली तीव्र दुष्काळाची परिस्थिती, धान खरेदीतील अनागोंदी आणि महायुती सरकारमधील अंतर्गत कलह या मुद्यांवरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. डबल इंजिन सरकार निर्णय घेण्यास पूर्णपणे नापास झाले असून शेतकरी उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यात तीव्र दुष्काळ पडून पिके करपली असतानाही सरकारला अजूनही जाग आलेली नाही. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळाबाबत तातडीने निर्णय जाहीर केला, मग महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार निर्णय का घेऊ शकत नाही? केंद्रात सत्ता असूनही हे सरकार काहीच करत नाही, असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला. शेतीच्या प्रश्नांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंर्त्यांना पत्र लिहून केलेल्या मागण्या अत्यंत योग्य असून, त्यांच्यासह आम्ही सर्वजण या मागणीसाठी पुढे आलो आहोत. मात्र, हे सरकार मेलेल्यांच्या टाळूचे लोणी खाण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.
कुंपणच शेत खातंय
भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होते, परंतु तिथे शेतकरी अक्षरश: भरडला जात आहे. धान खरेदीमध्ये कसा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे, याचे ठोस पुरावे सरकारसमोर मांडण्यात आले असून हा मुद्दा विधानसभेतही गाजवला असल्याचे त्यांनी सांगितले. ‘कुंपणच शेत खातंय’ ही म्हण या सरकारला तंतोतंत लागू होत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
वडेट्टीवारांकडे पुरावे असतील
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टेंडर आरोपांवर बोलताना, त्यांच्याकडे नक्कीच काही माहिती असेल, त्या आधारावरच त्यांनी ते वक्तव्य केले असेल, असे स्पष्ट केले. तर ममता बॅनर्जींच्या चिन्हाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोलताना, निवडणूक आयोग कोणाच्या इशा-यावर चालतो हे सर्वांनाच माहीत असल्याचे त्यांनी सुनावले.
महायुतीमधील अंतर्गत कलह
महायुती सरकारमध्ये सध्या तीव्र अंतर्गत कलह आणि स्पर्धा सुरू असून ठाण्यात गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू आहेत. प्रत्येक जिल्ह्यात असेच वाद सुरू असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान होत असून राज्य बरबाद होत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी शेवटी केली.
















