कल्याण : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे तीन दिवस उरले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच निर्णय देणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या निकालापूर्वीच राहुल नार्वेकर आजारी पडल्याने विरोधकांनी त्यावरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांचे आजारी पडणे हा सुद्धा राजकीय भूकंपाचा भाग असल्याची टीका विरोधकांनी केली होती.
त्यानंतर आता अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट सुरू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बैठकीत काय चर्चा होणार? अशी चर्चा केली जात आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी आहेत. आजारी असूनही नार्वेकर हे ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची भेट ठरलेली नव्हती. पण अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही गुप्त भेट होती. पण मीडियाला या भेटीची कुणकुण लागली. ‘वर्षा’ बंगल्यावर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात बैठक सुरू आहे. तिसरा कोणताही नेता यावेळी उपस्थित नाही. दोन्ही उपमुख्यमंत्रीही या बैठकीत नाहीत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नार्वेकरच देणार निर्णय
येत्या १० जानेवारी रोजी म्हणजे तीन दिवसांनंतर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हेच हा निर्णय देणार आहेत. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. उद्या शिंदे गटाच्या विरोधात निकाल गेला तर शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकते. त्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यापूर्वीच नार्वेकर हे ‘वर्षा’वर दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चर्चा गुलदस्त्यात
दोन्ही नेत्यांच्या बैठकीत प्रामुख्याने आमदारांच्या अपात्रतेवरच चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नेमकी काय चर्चा होणार? हा तपशील गुलदस्त्यात आहे. तीन दिवसांवर निकाल आला आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडी काय असतील हे दोन दिवसांतच दिसून येईल, असे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे.