औसा : प्रतिनिधी
मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिका-यांसह शेतक-यांनी बुधवारी दुपारी औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तावशी ताड येथे रस्ता रोको आंदोलन केले. पावसातच झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी करपलेले सोयाबीनचे पीक महामार्गावर जाळून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. अचानक करण्यात आलेल्या रस्ता रोकोमुळे औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, दि. २१ सप्टेंबरपासून तावशी ताड येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुस-या दिवशी बुधवारी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी जमले. पावसाची पर्वा न करता त्यांनी औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करून शासनाचे लक्ष शेतक-यांच्या प्रश्नांकडे वेधले. यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषत: सोयाबीन, तूर, कापूस, उडीद आणि मूग पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक भागांत पिके करपली आहेत. त्यामुळे शेतक-यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतक-यांना थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
छावा संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये मराठवाड्यासह लातूर जिल्ह्या कोरडा दुष्काळ जाहीर करणे, शेतक-यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये अनुदान देणे, सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांचा प्रलंबित पीकविमा तातडीने देणे तसेच नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देणे, या मागण्यांचा समावेश आहे. रस्ता रोकोदरम्यान आंदोलकांनी करपलेले सोयाबीन औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरच जाळून शासनाचे लक्ष शेतक-यांच्या नुकसानीकडे वेधले. ‘दुष्काळ जाहीर करा’, शेतक-यांना तातडीने मदत द्या’, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिका-यांनी दिला.
















