परभणी : जिल्ह्यातील शेतकरी पावसाने ओढ दिल्याने संकटात सापडला आहे. संकटाच्या काळात शेतक-यांना वा-यावर सोडले जाणार नसून राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात परभणी जिल्ह्यातील सर्वच ९ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. नुकसानाची योग्य ती दखल घेऊन, सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी आज शनिवार, दि.२६ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील मरडसगाव (ता. गंगाखेड), दैठणा, श्री नृसिंह पोखर्णी (ता. परभणी) व पाथरी येथील शेतक-यांच्या शेतात प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतक-यांशी आस्थेने संवाद साधला आणि हिम्मत खचू देऊ नका, संकटाच्या काळात शासन तुमच्या पाठीशी आहे, असा धीर दिला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, पावसाचा खंड पडल्यामुळे पिके करपून गेली आहेत. शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाला प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्याबाबत शासन आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही आवश्यक ती मदत करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थितीची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतक-यांनी पिकांचे नुकसान, पावसातील प्रदीर्घ खंड, भविष्यातील पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांसाठी चा-याची गरज याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी मरडसगाव (ता. पालम) येथील अझर अहमद मोहोयुद्दीन सरवर, दैठणा (ता. परभणी) येथील शेषराव हरिभाऊ गायकवाड, पाथरी येथील बालासाहेब साहेबराव नाईक या शेतक-यांच्या शेतात जावून पाहणी केली.
या वेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आ. प्रतापराव पाटील-चिखलीकर, आ. विक्रम काळे, आ. राजेश विटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, माजी आ. मधुसुदन केंद्रे, पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, संगीता चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भास्कर कोळेकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, कैलास वाघमारे, नितीन गर्जे, उषाकिरण श्रृंगारे, ऋषिकेश सावंत, तालुका कृषि अधिकारी गोविंद कोल्हे यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
मला दुष्काळी परिस्थितीची जाणीव आहे
मी स्वत: मराठवाड्याची लेक आहे. मराठवाड्यातील शेतक-यांच्या अडचणी आणि येथील दुष्काळी परिस्थितीची मला जाणीव आहे. शेतक-यांच्या भावना आणि त्यांच्या अडचणींची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. कोणत्याही शेतक-याला वा-यावर सोडले जाणार नाही. शेतक-यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चारा आणि पाण्याबाबत शेतक-यांनी काळजी करू नये, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परभणी जिल्हा दौ-यात बोलताना सांगितले.
















