नवी दिल्ली : संसदेच्या आचार समितीच्या बैठकीत गुरुवारी मोठा गदारोळ झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधीपक्षांचे खासदार आचार समितीची बैठक अर्धवट सोडून निघून गेले. महुआ मोईत्रा यांना वैयक्तिक आणि अनैतिक प्रश्न विचारण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी या आरोपांबाबत उत्तर दिले आहे. विनोद सोनकर म्हणाले की, प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी महुआ मोईत्रा संतप्त झाल्या आणि त्यांनी सभापती व समिती सदस्यांविरुद्ध अपशब्द वापरले. खासदार दानिश अली, गिरधारी यादव आणि रेड्डी यांनी समितीला दोष देण्याचा प्रयत्न केला आणि सभात्याग केला. या विषयावर समिती पुन्हा बसून पुढील कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दानिश अली यांनी समितीमध्ये विचारलेल्या वैयक्तिक प्रश्नांना ‘द्रौपदीची विटंबना’ असे संबोधले होते, असे पत्रकारांनी सांगताच सभापती विनोद सोनकर म्हणाले की, त्यांच्याशी संबंधित असलेले प्रश्न टाळण्यासाठी असे आरोप करण्यात आले आहेत. समितीची बैठक अर्धवट सोडून विरोधी पक्षाचे खासदार संतापाने बाहेर पडले. त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. यावेळी महुआ मोईत्राही चांगल्याच चिडलेल्या दिसल्या. महुआ मोईत्रा या बैठकीतून बाहेर पडताना पत्रकारांना म्हणाल्या की, ही कसली बैठक होती? ते सर्व प्रकारचे घाणेरडे प्रश्न विचारत होते. विरोधी नेत्यांपैकी एक बसपा खासदार दानिश अली म्हणाले की, आम्ही बाहेर पडलो कारण मोईत्रा रात्री कोणाशी बोलतात असे प्रश्न विचारले जात होते. याचा अर्थ काय, असे ते म्हणाले.