नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचा संसदेचा अधिकृत लॉगिन आयडी केवळ दुबईतील व्यावसायिक मित्र दर्शन हिरानंदानी यांनाच शेअर केला नसून त्याचबरोबर इतर ठिकाणीही शेअर केल्याचे समोर आले आहे. त्यांचे अकाउंट दुबईबरोबरच अमेरिका, बंगळुरू येथूनही ऑपरेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी त्यांनी कबूल केले होते की, लोकसभेत विचारले जाणारे प्रश्न टाइप करण्यासाठी हिरानंदानी यांच्या कार्यालयातील कोणीतरी त्यांना मदत करण्यासाठी हे अकाउंट दुबईतून ऑपरेट केले. संसद सदस्यांनी सहायक व कर्मचा-यांना लॉगिन शेअर करू नयेत, असा कोणताही नियम नाही, असा दावाही त्यांनी केला होता. त्यांनी फक्त प्रश्न टाइप करण्यासाठी व्यावसायिक मित्राची मदत घेतली आणि ओटीपी त्यांच्या नियंत्रणात होता, असेही त्यांनी म्हटले होते. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने समितीला सांगितले की, मोइत्रांचे लॉगिन अमेरिका, बंगळुरू, कोलकाता व दुबईहूनही वापरण्यात आले.