छत्रपती संभाजीनगर : शासनाने मला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला, दडपशाही केली किंवा माझ्याविरोधात षडयंत्र रचले तरी मी एक पाऊलही मागे हटणार नाही. मी मरेन; पण सरकारपुढे कधीही शरण जाणार नाही. गुलाम होण्यापेक्षा समाजाच्या हक्कासाठी लढता लढता मरणे मी पसंत करेन, असा अत्यंत आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी तुरुंगात जाण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट राजकीय तोफ डागताना जरांगे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: माझ्याविरोधात बैठका घेत आहेत. तुम्ही कितीही लोक माझ्या अंगावर घातले तरी मी मागे हटणार नाही. आम्ही नेहमी फडणवीस साहेबांवर बोलत राहिलो; मात्र जे स्वत:ला मित्र म्हणवत होते, तेच एकनाथ शिंदे आज आमचे शत्रू निघाले आहेत. आपण कोणालाही शरण जात नाही मॅनेज होत नाही आणि त्यांचे ऐकत नाही, म्हणूनच सत्ताधा-यांना आपण वैरी वाटत असल्याचा घणाघात त्यांनी केला. केवळ शिवीगाळ केल्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अनुकंपाऐवजी विशेष बाब शब्द वापरा
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत बोलताना जरांगे यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले. सरकारने केवळ गोड बोलून वेळकाढूपणा करू नये. भरती प्रक्रियेत टाळाटाळ न करता अनुकंपाऐवजी विशेष बाब हा शब्द वापरून मराठा तरुणांना नियुक्त्या द्याव्यात.
जात पडताळणी अडवू नका
जात वैधता प्रमाणपत्रांची प्रक्रिया हेतुपुरस्सर थांबवून ठेवू नये. काही भ्रष्ट अधिकारी आरक्षण उपसमिती आणि सरकारची दिशाभूल करत असून कोणाच्याही दबावाखाली येऊन मराठा समाजाचे नुकसान करू नका.
















