25.8 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeराष्ट्रीयसद्य स्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगात मरणे चांगले

सद्य स्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगात मरणे चांगले

मुंबई : प्रतिनिधी
कॅनरा बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीने १ सप्टेंबरला नरेश गोयल यांना अटक केली होती. तेव्हापासून तुरुंगात असलेल्या गोयल यांना काल विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. जीवनाची प्रत्येक आशा संपली आहे, सध्याच्या स्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगात मरणे चांगले आहे. नियतीने जे लिहून ठेवले आहे, त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत, अशी हतबलता व्यक्त करून जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी विशेष न्यायालयासमोर शनिवारी अक्षरश: रडायला सुरुवात केली.

गोयल यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आजारी असलेल्या पत्नीची त्यांना आठवण येत असून, तिची काळजी घेण्यासाठी कोणीही नसल्याचे गोयल यांनी न्यायालयाला सांगितले. ७४ वर्षीय गोयल यांच्या पत्नी अनिता यांना कर्करोगाचे निदान झाले असून त्या सध्या उपचार घेत आहेत. ईडीने मागच्या वर्षी नरेश गोयल यांना अटक केल्यानंतर ते आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समोर त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

विशेष न्यायालयात सुनावणी सुरू असताना नरेश गोयल यांनी हात जोडून न्यायालयाला सांगितले, माझी प्रकृती नाजूक आहे. पत्नी कर्करोगाशी झुंज देत असून एकुलती एक मुलगीही आजारी आहे. तुरुंगातील अधिकारी मला मदत करण्याची भूमिका घेतात, पण त्यांच्याही काही मर्यादा आहेत, गोयल यांच्या पत्नी जेजे रुग्णालयात उपचार घेत आहेत. नरेश गोयल यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश म्हणाले की, मी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी माझ्या लक्षात आले की, गोयल यांचे शरीर थरथरत होते. त्यांना नीट उभेही राहायला येत नव्हते. आधार घेऊन ते उभे होते. न्यायाधीशांनी पुढे म्हटले की, त्यांनी मांडलेले मुद्दे मी लक्षपूर्वक ऐकले. आरोपीला आश्वस्त केले की, त्यांना वा-यावर सोडले जाणार नाही. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक प्रकृतीची काळजी घेतली जाईल आणि त्यांना उपचारही दिले जातील.

पुढील सुनावणी १६ जानेवारीला
मागच्या महिन्यातच नरेश गोयल यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी आपल्याला विविध आजार असल्याचे सांगितले होते. हृदय आणि हाडांशी निगडित विविध आजार असल्याची सबब गोयल यांनी दिली होती. ईडीने त्यांच्या जामीन अर्जावर आपले उत्तर दाखल केले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR