मुंबई : २ ऑक्टोबरचे सत्य ‘दृश्यम’च्या प्रत्येक चाहत्याला माहीत आहे. पाव भाजी, सत्संग, चित्रपट आणि मग विजय साळगावकरचा तो खेळ, ज्याने पोलिसांना वर्षानुवर्षे गुंतवून ठेवलं. पण यावेळी कथा फक्त २ ऑक्टोबरपुरती मर्यादित राहिलेली नाही.
आता आणखी एक तारीख समोर आली आहे ती म्हणजे २३ जुलै. अखेर त्या दिवशी विजय कुठे होता? काय घडलं होतं? आणि या तारखेच्या आधारे पोलीस विजयने रचलेली संपूर्ण कहाणी उलटवू शकतात का?
इथूनच चित्रपटाचा खरा खेळ सुरू होतो. समोर आहेत पोलीस अधीक्षक राजवीर सिंह तोमर, ज्यांच्याकडे प्रश्नही आहेत आणि विजयला घेरण्याचा निर्धारही. दुस-या बाजूला विजय आहे, ज्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचं डोकं. चित्रपट अनेकदा तुम्हाला विश्वास पटवून देतो की यावेळी विजय अडकला आहे. मग विजय शांत होतो. त्याच्या मनात नेमके काय सुरू आहे, असा विचार तुम्ही करू लागता. हाच या चित्रपटाचा आनंद आहे.
अजय देवगण यांचा विजय आता केवळ एक व्यक्तिरेखा राहिलेला नाही. चेह-यावर फारशी हालचाल नाही. आवाजातही फारसा बदल नाही. पण त्यांचे डोळे खूप काही सांगतात. तुम्ही विजयकडे पाहता आणि विचार करता की तो एवढा शांत का आहे? हीच शांतता कथेमधील रोमांच वाढवते. दुसरीकडे जयदीप अहलावत आहेत. राजवीरच्या भूमिकेतील त्यांचा अंदाज शांत आहे. ते हळूहळू विजयच्या जवळ येतात. हेच त्यांचे सर्वात मोठे अस्त्र आहे. सुरुवातीला दोघांमधील टक्कर चित्रपटाला खिळवून ठेवते. काही ठिकाणी चित्रपटाची गती मंदावते. पण अजय आणि जयदीप आमनेसामने येताच रोमांच पुन्हा वाढतो. प्रकाश राज हेही आपल्या भूमिकेत शानदार आहेत. त्यांचे संवाद आणि अंदाज कोर्टातील प्रसंग अधिक प्रभावी बनवतात.
















