जिंतूर : तालुक्यातील इटोली ते डिग्रस मार्गावरील मसोबा मंदिर परिसरात अवैधरीत्या रेती वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर जिंतूर पोलिसांनी दि. ११ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर व ट्रॉलीसह २ ब्रास रेती जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल १० लाख १४ हजार रुपयांचा आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री १२.२५ वाजण्याच्या सुमारास इटोली ते डिग्रस रस्त्यावरील मसोबा मंदिर परिसरात विनापरवाना रेती वाहतूकीवर पोलिसांनी कारवाई करून ट्रॅक्टर व ट्रॉली, २ ब्रास रेती असा एकूण १० लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा परभणीचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश सवंडकर व इतर पोलिसांनी केली. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणा-यांचे धाबे दणाणले आहे.
















