छ. संभाजीनगर: व्हिक्टोरिया ॲग्रो फूड प्रोसेसिंग प्रा. लि. या कंपनीने युनियन बँक ऑफ इंडिया व बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकांची ३३.५३ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात खोटी कागदपत्रे देवून फसवणूक केल्याचा प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रातील एक आरोपी असलेल्या अरविंद पाटील निलंगेकर यांची या प्रकरणी दाखल केलेली फौजदारी फेरविचार याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांना जोरदार दणका दिला आहे.
व्हिक्टोरिया ॲग्रो फूडने युनियन बँक ऑफ इंडिया व बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकांकडून ३३.५३ कोटी रुपयांचे कर्ज घेताना तारण म्हणून बॅंकेकडे दाखल केलेल्या जमीनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून जमीनीचे बनावट मूल्य वाढवत फसवणूक केल्या प्रकरणी युनियन बँकच्या तक्रारीवरून सीबीआयने सखोल तपास करत कंपनीवर व या कंपनीशी संबंधित आरोपींवर आर्थिक फसवणुकीचे फौजदारी गुन्हे दाखल केले होते व न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. या प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकर हेही आरोपी आहेत.
सीबीआयने आपल्यावर दाखल केलेल्या फौजदारी गुन्ह्यातून आपली मुक्तता करण्यात यावी अशी फेरविचार याचिका अरविंद पाटील निलंगेकर यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. या प्रकरणात बॅंकेसोबत कर्ज प्रकरणाचे वन टाईम सेटलमेंट करण्यात आल्याने आपल्यावरील फसवणुकीचे फौजदारी गुन्हे निरस्त होतात असा दावा निलंगेकर यांनी केला होता. मात्र लातूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने व विशेष न्यायालयाने त्याचा हा दावा फेटाळून लावत त्यांच्यावरील आर्थिक फसवणुकीचे फौजदारी गुन्हे कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता.
या निर्णयाला निलंगेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फेरविचार याचिका दाखल करून आव्हान दिले होते. मात्र सविस्तर सुनावणीनंतर १३ ऑक्टोबर २०२६ रोजी खंडपीठाने आपला निर्णय जाहीर करत ही फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे. कर्ज प्रकरणाचे वन टाईम सेटलमेंट झाले म्हणून बॅंकेची खोटे कागदपत्र देवून व कागदपत्रांमध्ये फेरफार करून आर्थिक फसवणूक केल्याचा कटाच्या गुन्ह्यातून सुटका होवू शकत नाही, असे स्पष्टपणे नमूद करत खंडपीठाने अरविंद पाटील निलंगेकर यांची फौजदारी फेरविचार याचिका फेटाळून लावत त्यांना जोरदार दणका दिला आहे.
यासंदर्भातील सर्व अर्ज खंडपीठाने खारीज केले आहेत. तथापि आरोपींच्या वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अरविंद पाटील निलंगेकर यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खंडपीठाच्या या निर्णयामुळे आता त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहिल्याने लातूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
















