पोत्यात बांधून रस्त्यालगत झुडुपात टाकून दिला होता मृतदेह
निलंगा : प्रतिनिधी
लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कवठा पाटीजवळील शेतात एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोत्यात बांधून हा मृतदेह रस्त्यालगत टाकल्याचे दिसून आले. परंतु हा प्रकार उघड होताच परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार शेतातून दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमागे घातपात असण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, पोलिस मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम करीत आहेत.
कवठा पाटीजवळ निशांत कांबळे यांचे शेत आहे. या शेतातील रस्त्यालगतच्या खड्ड्यात हा मृतदेह आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार मृतदेह ४ ते ५ दिवसांपूर्वी येथे टाकण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख आणि मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागील गूढ उकलण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. परंतु पोत्यात बांधून ठेवलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून, पुढील तपास निलंगा पोलिस करीत आहेत.
मृतदेहाची ओळख पटेना
निलंगा तालुक्यातील कवठा पाटीलगत असलेल्या शेतात झुडुपात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. आता हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून, त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहेत. तसेच या घटनेच्या कारणांचाही शोध घेतला जात असून, मृतदेहाची ओळख पटल्यास या घटनेचे गूढ उकलण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
















